34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeधाराशिवसांजा येथे जमावाच्या मारहाणीत संशयित चोरट्याचा मृत्यू

सांजा येथे जमावाच्या मारहाणीत संशयित चोरट्याचा मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
ट्रेलरसह ट्रॅक्टर चोरी केल्याच्या संशयावरून सांजा (ता. धाराशिव) येथील नागरिकांनी केलेल्या मारहाणीत एका संशयित चोरट्याचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. तिसरा चोरटा फरार झाला आहे. जखमीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक जनार्धन शिंदे रा. खंडाळा ता. जि. लातूर असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.१८) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांजा गावात घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून तीघांच्या विरोधात चोरीचा तर मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून २० ते २५ जणांच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७ सह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक हेमंत कदम दोन्ही गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांजा येथील सुग्रीव किसन मेंढे यांचे सांजा शिवारात वरूडा रोडलगत शेत असून त्यांनी रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ज्वारीची मळणी केल्यानंतर खळ््याजवळ ट्रेलरसह ट्रॅक्टर उभा केला होता. ते जेवण करण्यासाठी घरी आले होते. रात्री अकरा वाजता शेतात गेल्यानंतर ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते तात्काळ चोरीची फिर्याद देण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात आले. तेथील उपस्थित पोलीसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही. त्यांना ट्रॅक्टरचा शोध घेण्यास सांगितले. त्यांनी गावातील लोकांना ट्रॅक्टर चोरीची माहिती दिल्यानंतर त्यांना औसा रोडच्या दिशेने निळ््या रंगाचे हेड असलेला ट्रॅक्टर रात्री जात असल्याचे सांगितले. ट्रॅक्टर मालक सुग्रीव मेंढे यांच्यासह गावातील काही लोकांनी औसा रोडने जाऊन शोध घेतला असता त्यांना आशीव गावच्या पुढे मातोळा गावाजवळ त्यांचा ट्रॅक्टर दिसला. ट्रॅक्टरजवळ दोघे संशयित चोरटे दिसले. त्यापैकी एकजण फरार झाला. सांजा येथील लोकांनी संशयित एक चोरटा व ट्रॅक्टर रविवारी रात्री सांजा गावात आणला. चोरट्याकडे आणखी साथीदारांची नावे विचारल्यानंतर त्याने चोरीमध्ये अशोक जनार्धन शिंदे यांचे नाव सांगितले. त्याला फोन करून सांजा गावात बोलावून घेतले.

यावेळी जमावाने अशोक शिंदे व दुसरा संशयित झाडके दोघेही रा. खंडाळा यांना काठी, पाईपने मारहाण केली. यामध्ये अशोक शिंदे यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर झाडके यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक शिंदे यांच्या नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी सरिता शिंदे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक सुग्रीव मेंढे यांच्यासह सांजा गावातील अनोळखी २० ते २५ जणांवर कलम ३०२, ३०७ सह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर मालक मेंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक हेमंत कदम करीत आहेत. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ पंचनामा पोलिसांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR