31.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रकुटुंबाला सक्षमतेच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत

कुटुंबाला सक्षमतेच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत

पुणे (प्रतिनिधी)
देशाच्या विकासाची फळे समाजाच्या प्रत्येक स्तरावरील अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजेत, सरकारच्या प्रत्येक योजनेचा संपूर्ण लाभ लाभार्थीला मिळाला पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला सक्षमतेच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, यावर मोदी सरकारने नेहमीच भर दिला आहे, असे भारतीय जनता पार्टी प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अंत्योदयच्या संकल्पनेवर भारतीय जनता पार्टीची श्रद्धा असून अंत्योदयच्या नीतीवरच पक्षाची वाटचाल सुरू असल्याने मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत आखलेल्या प्रत्येक योजनेचे लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहेत, असा दावाही केला.

गरिबांच्याही संपत्तीवर डोळा असलेली व संपत्ती काढून घेऊन अन्य समाजात तिचे वाटप करण्याचा कट आखणारा पक्ष आणि प्रत्येक समाजघटकास संपत्ती निर्माण करण्याच्या संधी देणारी भाजप असा हा सामना आहे, असेही ते म्हणाले. एका बाजूला तुष्टीकरणाचे राजकारण आणि दुसरीकडे मोदी सरकारचे विकासाचे राजकारण यांतील संघर्षात देशातील जनतेने कायमच विकासाच्या राजकारणास साथ दिल्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची सातत्याने हार होत असल्याने आता जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसला देशातील सामाजिक व्यवस्थेची वीण नष्ट करायची असून केवळ मते मिळवून सत्तेसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करायचे आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच अशा राजकारणाविरोधात संघर्ष केला असून देशातील जनता काँग्रेसचा हा कट उधळून लावेल, असा विश्वासही उपाध्ये यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR