38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeधाराशिवकार्यकर्त्यांना जुळवून घेताना होतेय अडचण...

कार्यकर्त्यांना जुळवून घेताना होतेय अडचण…

सतीश टोणगे
कळंब : निष्ठावंत पक्षकार्यकर्ते आज अभावानेच दिसून येतात. नेत्यांचे कार्यकर्ते हेच त्या पक्षाचे कार्यकर्ते समजले जातात. नेत्यांनी निष्ठा बदलली की, कार्यकर्त्यांच्या निष्ठादेखील बदलतात. जिल्ह्यातील महायुती व महाआघाडीच्या राजकारणात नेते मंडळींनी तर जुळवून घेतल्याचे चित्र आहे; परंतु या नेतेमंडळीच्या कार्यकर्त्यांना जुळवून घेणे जड जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील विविध पक्षीय नेतेमंडळी सोयीचे राजकारण करतात, असे नेहमीच बोलले जाते. त्यामध्ये केवळ निवडणुकांपुरताच विरोध असतो. बाकी ‘एकमेका सा करू,’ याप्रमाणे वागत असल्याची भावना सर्वसामान्यांत आहे.

 

राज्यातच राजकारणात नव्या युती, नव्या आघाड्या जन्माला आल्या आहेत. गत निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेली नेतेमंडळी आज मांडीला मांडी लावून बसत आहेत. गतवेळी गळ्यात गळे असलेले नेते आज एकमेकांविरोधात लढत आहेत. यात कार्यकर्त्यांची गोची झाल्याचे दिसून येते. आपल्या नेत्याच्या जिवावर अनेकांनी दुस-या नेत्याला अंगावर घेतले आहे; परंतु आता त्याच नेत्याच्या प्रचाराची वेळ या कार्यकर्त्यांवर आली आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्ते केवळ विशेष बैठका, मेळावे, कार्यक्रमांना उपस्थितीचे काम करीत आहेत.

राज्यासह जिल्ह्यात महायुती व महाआघाडी यांच्यात लढत होत आहे. रात्र वै-याची समजून या महायुती व महाआघाड्यांतील घटक पक्ष प्रचाराचे रान उठवतील का? त्यामुळे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या-त्या घटक पक्षांतील कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे महायुती व महाआघाडीतील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींना आपल्या कुंपणावर द्विधा मन:स्थितीत असलेल्या कार्यकर्त्यांना कामाला जुंपावे लागणार आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांच्या लोकप्रतिनिधी, नेतेमंडळींची संख्या अधिक आहे. एकाच पक्षात अनेक लोकप्रतिनिधी, पुढारी आहेत. त्यांचे कार्यकर्तेही स्वतंत्र असल्याचे चित्र आहे. एकाच पक्षातील एका पुढा-याचे कार्यकर्ते, पदाधिकारी वगळता दुस-या पुढा-याकडे जातही नाहीत. अनेक नेत्यांनी दुस-या नेत्यांचे कट्टर विरोधक कार्यकर्तेही आपल्या छत्रछायेखाली घेतले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR