34.5 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरसोलापुरातून जप्त केला १५ लाखांचा गांजा

सोलापुरातून जप्त केला १५ लाखांचा गांजा

सोलापूर : निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर अ‍ॅक्टिव मोडवर उतरली आहे. अमली पदार्थांच्या अवैध विक्रीबद्दल शोध घेताना गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे मारून तब्बल १५ लाख ५० हजार ३८० रुपयांचा ७७.५२१ किलो गांजाचा साठा जप्त केला. एनडीपीएस अ‍ॅक्ट अन्वये शहरातील ही मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. अजित सुखदेव जगताप (रा. स्वराज विहार, सोलापूर, मूळ रा. सोहाळे, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. खबऱ्यामार्फत नमूद आरोपी गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. खबरीनुसार गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील फौजदार अल्फाज शेख यांनी शहरातील स्वराज विहार येथे सापळा लावून छापा मारला. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या स्वराज विहार व सोहाळे (ता. मोहोळ) येथील घरांमध्ये तब्बल ७७ किलो ५२१ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

त्याचे बाजारमूल्य १५ लाख ५० हजार ३८० रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. फौजदार अल्फाज शेख यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलम ८ (क), २० (क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अजित जगताप याला अटक करून येथील न्यायालयात उभे केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. तपास सपोनि संजय क्षीरसागर करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, उपायुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय क्षीरसागर, फौजदार अल्फाज शेख, पोलिस बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, अनिल जाधव, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, वसीम शेख, ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, नेताजी गुंड, सायबरचे अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड यांनी केली.

मोहोळ व चिंचोली एमआयडीसीत जप्त केलेल्या एमडी ड्रग्जच्या कारवाईत लाखो रुपयांचा साठा जप्त करून आरोपींना अटक झाली आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची पहिलीच वेळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR