35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रविनोद पाटलांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार

विनोद पाटलांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली. लोकसभा निवडणूक न लढवता तटस्थ राहण्याची भूमिका विनोद पाटील यांनी घेतली आहे. कुणाला पाठिंबा न देता, कोणत्या पक्षासोबत न जाता आणि अपक्ष निवडणूक न लढवता तटस्थ राहिले पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, मी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. मी निवडणूक लढवली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण शहरातील सत्ताधारी दोन आमदार आणि एक खासदाराने मला उमेदवारी देऊ नयेत, यासाठी टोकाचा विरोध केला, असा आरोप विनोद पाटील यांनी केला. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवली पाहिजे असा आग्रह शहरवासीयांनी धरला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

नाक रगडून लोकांची माफी मागतो
ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास सांगितले. कालही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत माझे बोलणे झाले. मागील दोन तीन दिवसांत मी नागरिकांशी चर्चा केली. मी अपक्ष निवडणूक लढवल्यास मी निवडून येऊ शकतो, पण निवडून आलो नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता हा डाग मला लावून घ्यायचा नाही. मी कुणाला फायदा व्हावा यासाठी माघार घेत नाही. उद्यापासून लोकांची भेट घेणार आहे. नाक रगडून लोकांची माफी मागतो, मी सार्थ ठरलो नाही, असेही ते म्हणाले. ज्यांची घर काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावर दगड मारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR