38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसोलापूरएसटी स्थानकात पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांची नाराजी

एसटी स्थानकात पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांची नाराजी

सोलापूर : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे डॉक्टर वारंवार पाणी पिण्यासाठी सांगत आहेत; पण प्रवास करणे गरजेचेच आहे. ते दुपारीही प्रवास करत आहेत; पण एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना स्थानकात पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असतानाही, त्याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्याची बॉटल खरेदी करण्याचा भुर्दंड बसत आहे, असे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.

सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागल्याने दुपारी रस्त्यावर शांतता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे दुपारच्या वेळी रस्ते जरी सामसूम असले तरी एसटी आणि रेल्वे स्थानक मात्र गजबजलेले पाहायला मिळत आहे. या ठिकाणी प्रवाशांना प्राथमिक सोयी पुरवणे गरजेचे आहे. यात प्रवाशांना स्वच्छतागृहे, स्वच्छ स्थानक, पाण्याची सोय करणे गरजेचे आहे; पण एसटी स्थानकात हे चित्र क्वचितच पाहायला मिळते.

काही दिवसांपूर्वी स्थानकातील स्वच्छतागृह परिसरातील फोटो व्हायरल झाले होते. यामुळे सोलापूर स्थानकातील घाण ही चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर स्थानकातील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या नळाच्या तोट्या तुटल्याचेफोटो व्हायरल झाले. याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे होते; पण प्रशासनाकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात न आल्याने प्रवाशांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

एसटी स्थानकात एकूण दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याच सोय आहे. यात मुख्य स्थानकातील नळ हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर दुसरीकडे प्रवेशद्वाराजवळच पिण्याच्या पाण्यासाठी नळ आहे; पण अनेक जण चूळ भरतात. अशा ठिकाणी प्रवासी पाणी पिण्याचे टाळत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. यामुळे त्या ठिकाणी पाणी पिण्यापेक्षा अनेकांना नाइलाजाने पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागत आहे.

स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे; पण ही सोय नसल्याने आम्हाला पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. यामुळे आम्हाला आर्थिक भुर्दड बसत आहे. याबाबत आम्ही अनेक वेळा तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले आहे; पण त्यांच्याकडू अद्याप सोय करण्यात आली नाही असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR