27.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeसोलापूरचैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्य पूजा

चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्य पूजा

पंढरपूर /प्रतिनिधी
चैत्री शुद्ध कामदा एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. प्रकाश महाराज जंवजाळ यांनी केली.

वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या वारीपैकी चैत्री वारीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असल्याने भाविकांना मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले आहे. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून समितीच्या वतीने दर्शन रांगेत व दर्शन मंडपात शुध्द पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर व मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.

श्रींच्या गर्भगृह संवर्धन कामांची पाहणी
काम वेळेत पूर्ण करण्याच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सूचना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असून सदर ठिकाणच्या कामांची मंदिर समितीच्या सर्व सदस्यांनी पाहणी केली. या वेळी संबधित ठेकेदाराने नेमून दिलेल्या वेळेत दर्जेदार काम करावे तसेच पुरातत्व विभागाने व संबंधित ठेकेदाराने यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ वाढवावे, अशा सूचना सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या.

तद्नंतर आराखड्यातील कामासंदर्भात सहअध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९.३० वाजता मंदिर कार्यालयात सभा झाली. या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, ह. भ. प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ. दिनेशकुमार कदम, ह. भ. प. भास्करगिरी महाराज, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभागप्रमुख बलभीम पावले, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व कामाचे ठेकेदार उपस्थित होते.

या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच सोळखांबी येथील सर्व लाकडी दरवाजांना देणगीदारांमार्फत चांदी लावणे तसेच विठ्ठल सभा मंडप येथील संवर्धनाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करणे. याशिवाय, दर्शन रांगेतील कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या ४ पत्राशेडचे नूतनीकरण करणे, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे विद्युत व्यवस्थेसाठी सोलार पॅनल बसवणे इत्यादी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR