36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeधाराशिवलाच प्रकरणी कृषी सहाय्यकास सात वर्षाची शिक्षा

लाच प्रकरणी कृषी सहाय्यकास सात वर्षाची शिक्षा

धाराशिव : प्रतिनिधी
शाळा सोडल्याचा मूळ दाखला व इयत्ता दहावीचा मूळ मार्कमेमो देण्यासाठी एक हजाराची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यामुळे कुंभारी (ता. तुळजापूर) येथील लक्ष्मीबाई बाबूराव पाटील कृषी तंत्रनिकेतनमधील कृषी सहाय्यक अशोक दल्लू राठोड यांना न्यायालयाने सात वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या निकालाने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला व इयत्ता १० वीचा मूळ मार्कमेमो देण्यासाठी कृषी सहाय्यक अशोक राठोड यांनी १ हजार रूपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच स्विकारली होती. ते कुंभारी (ता. तुळजापूर) येथील लक्ष्मीबाई बाबूराव पाटील कृषी तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत होते. या प्रकरणी अशोक दल्लू राठोड यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये सन २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक असिफ बी. शेख यांनी सापळा रचून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

तब्बल ९ वर्षांनी हा खटल्याचा निकाल लागला आहे. सरकारची बाजू शासकीय अभियोक्ता पी. के. जाधव यांनी मांडली. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालला आणि लाचखोर कृषी सहाय्यक अशोक दल्लू राठोड यांना कलम ७ अन्वये ३ वर्ष कारावास व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास कलम १३(२) अन्वये ४ वर्ष कारावास व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR