38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषसुपारी फुटली, पण कोंडी फुटेना!

सुपारी फुटली, पण कोंडी फुटेना!

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघांत मतदान होणार असून, तेथील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी संपली. या पाच मतदारसंघांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ९७ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली तरी राज्यातील महायुती व महविकास आघाडीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. किंबहुना कोंडी फुटण्याऐवजी मित्रपक्षातला तणाव वाढत चालला आहे. दुस-या टप्प्यात राज्यातील आणखी आठ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक २६ एप्रिलला होणार असून तेथील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जागावाटपाबाबत दोन्ही आघाड्यांना निर्णय घ्यावाच लागणार आहे.

त्यामुळे ते होईलही. पण मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव, अविश्वास बघता यापुढचे राजकारण सोपे असणार नाही हे नक्की. भाजपाने चालवलेल्या दांडगाईमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने सांगली आणि मुंबईतील पाच मतदारसंघांत परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी आहे. मैत्रीपूर्ण लढतीचे पर्याय पुढे यायला लागले आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या हातून दोन तृतीयांश आमदार, खासदार, पक्षाचे नाव, चिन्ह गेले असले तरी आघाडीच्या जागावाटपात त्यांचाच वरचष्मा राहिला आहे. १४ आमदार असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभेच्या २२ जागा लढणार असल्याचे स्वत:च जाहीर करून उमेदवारांचीही घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही आघाड्यांवर अजूनही गोंधळाचे वातावरण आहे. जागा खेचण्यासाठी एवढी निकराची लढाई करणारे हे पक्ष निवडणुकीत किती मनापासून एकदिलाने लढतील याबद्दल शंका व्यक्त होत आहे. लोकसभेत ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत काय होईल? असा प्रश्न आघाडी, युतीतले नेते करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ झाली तर आश्चर्य वाटायला नको.

लोकसभेच्या दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. पण जागावाटपाचे गु-हाळ काही संपत नाही. ठाणे, सातारा, नाशिक, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आदी जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई आदी मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत बेबनाव झाला आहे. भाजपाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २१ उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिंदे गटाने ८ आणि अजित पवार गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीचे तब्बल १७ उमेदवार अजूनही जाहीर होऊ शकलेले नाहीत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांना याची बक्षिसी मिळणार असे गृहीत धरले जात होते. पण तसे होताना दिसत नाही. २०१९ ला नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत महायुतीत आले. विद्यमान खासदाराच्या जागा त्या त्या पक्षाला देण्याचे संसदेत खासदारांनी वेगळा गट केला तेव्हाच सांगण्यात आले होते. पण राजकारणात असल्या वचनांना काडीची किंमत नसते. आमच्या सर्वेक्षणानुसार तिथे गोडसे किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकणार नाही, त्यामुळे ती जागा आम्ही लढवणार अशी भूमिका आता भाजपाने घेतली आहे. आपल्यामुळे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आपण सांगू ते मान्य करतील असे भाजपाला वाटत असावे. पण त्यांचा हा अंदाज चुकला आहे. भाजपा व शिंदेसेनेत नाशिकवरून जुंपलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिकवर दावा सांगितला आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठीही अशीच तिन्ही पक्षांची रस्सीखेच सुरू आहे. उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे आहे. खासदार ठाकरे गटात गेले असले तरी तानाजी सावंत यांनी या जागेसाठी आग्रह धरला आहे. साता-यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्ट उदयनराजे भोसले यांनी धरला होता. दिल्लीत ठाण मांडून त्यांनी उमेदवारी मिळवली आहे. अजून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी उदयन राजे कामाला लागले आहेत. २०१९ ला ही जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. खासदार श्रीनिवास पाटील शरद पवार यांच्यासोबत असले तरी, अजित पवार गटाने या जागेवर दावा केला आहे.

सातारा मिळणार नसेल तर नाशिक द्यावेच लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. २०१९ ला रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेचे विनायक राऊत निवडून आले होते. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजपाने येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवण्याचे ठरवले होते. पण ते यासाठी फारसे उत्सुक नाहीत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना आपल्या भावाला येथून उभे करायचे आहे. त्यामुळे हा तिढाही अजून सुटलेला नाही. भाजपच्या दांडगाईमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. नेत्यांची टोकाची वक्तव्यं येतायत. मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला मदत केली तरी विधानसभेला भाजपाने आमच्यासमोर बंडखोर उमेदवार उभे केले होते, असा थेट आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्याची पुनरावृत्ती करू नका,असे त्यांनी सुनावले. बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहेत. सध्या भाजपात असलेल्या हर्षवर्धन पाटील आणि शिंदेंसोबत असलेल्या विजय शिवतारे यांनी उघडपणे अजित पवार यांना विरोध केला होता. देवेंद्र फडणवीस यांना या दोघांची मनधरणी करून शांत करावे लागले. पण त्यामुळे लगेच सगळं आलबेल होईल, असे समजण्याचे कारण नाही. किंबहुना भविष्यात मोठी उलथापालथ होऊ शकते व त्याची नांदी आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ !
एकीकडे महायुतीत जागावाटपावरून तणाव वाढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीसह मुंबईतील सहापैकी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीने भिवंडीवर दावा सांगितला आहे. यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी आघाडी उभारण्याची व ती टिकवण्याची जबाबदारी केवळ काँग्रेसवर आहे का? त्याची किंमत आम्हीच द्यायची का? असा सवाल केला जात आहे. सांगलीची जागा हिसकावून घेतल्यानंतर काँग्रेसला पंतप्रधानपद हवे आहे की सांगलीची एक जागा हवीय? असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला. काँग्रेसचे विशाल पाटील गेल्या दोन वर्षांपासून सांगलीतून तयारी करत होते. पण शिवसेनेने डबल हिंद केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारीही जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी तेथे मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थातच याचे परिणाम अन्य मतदारसंघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मैत्रीपूर्ण लढत झाली नाही तरी दुखावलेले मित्रपक्ष एकमेकांच्या विजयासाठी किती कष्ट घेतील? याबाबत शंका व्यक्त होते आहे.

राज ठाकरेंचे ठरेना!
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी दिल्लीत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती. पण त्याबाबतही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई व नाशिक या दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली असल्याची चर्चा होती. नाशिकसाठी आधीच तीन पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नाशिक सोडायला कोणीच तयार नाही. या पार्श्वभूमीवर मनसेकडून अजूनही महायुतीत जायचे की नाही? याबाबत चाचपणीच सुरू आहे.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR