40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरस्तनाच्या कर्करोगावरील जनजागृती मोहिमेचा जि.प.कडून प्रारंभ

स्तनाच्या कर्करोगावरील जनजागृती मोहिमेचा जि.प.कडून प्रारंभ

सोलापूर – जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ वर्षांवरील एकूण ७ लाख महिलांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, कंदलगावचे सरपंच शारदा कडते, उपसरपंच चाँद बादशाह सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ईशाधीन शेळकंदे, डॉ. फहिम गोलेवाले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, दक्षिण सोलापूरचे गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतिशील एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे, सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे, जनजागृती करणे, उपचाराकरिता पाठपुरावा करणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे, उपचारास जिल्हा परिषद निधीमधून २० हजारांपर्यंत सहाय करणे या गोष्टींचा समावेश आहे.

आज महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग याबाबत जनजागृती करणे तसेच महिलांनीही सदर आजाराविषयी न घाबरता पुढे येऊन तपासणी करून घ्यावी आणि या तपासणीसाठी पुरुषांनीही आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. या मोहिमेला ‘प्रोजेक्ट निदान’ हे नाव देण्यात आले आहे. कारण कर्करोगासारख्या आजारात लवकर निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो. म्हणूनच यासाठी स्वतंत्र अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR