30.7 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeलातूरदेशाचा विकास साधण्याचे व्हिजन काँग्रेसकडेच

देशाचा विकास साधण्याचे व्हिजन काँग्रेसकडेच

लातूर : प्रतिनिधी
देशाला विकासाकडे घेवून जाणारे व्हिजन असलेल्या काँग्रेस पक्षाचे आपण सर्वजण सदस्य आहोत. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अनेकांनी या पक्षात काम करुन देशाचा सर्वांगीण विकास साधला. गांधी घराण्याने स्वत:चे बलिदान देऊन लोकांच्या हिताचे काम केले. अशा काँग्रेसचा विचार, काँग्रेसचे कार्य लोकांपर्यंत गेले पाहिजे. यासाठी सर्वांनी कामाला लागावे. आता कोणीही स्वस्थ बसू नये. जोमाने प्रचार करावा. आपले बुथ, आपले गाव सोडू नये, अशा सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सहकारमहर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिल्या.
लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची व्यापक बैठक वाडा बॅक्वेट हॉल येथे शुक्रवार दि. २६ एपिल रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, लातूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, श्रीशैल उटगे, आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, सर्जेराव मोरे, शाम भोसले, प्रमोद जाधव, धनंजय देशमुख, संभाजी सूळ, सुनील पडिले, सचिन दाताळ, अनंतराव देशमुख, लालासाहेब चव्हाण, उमाकांत खलंग्रे, राजकुमार पाटील, शेषराव हाके पाटील, सुभाष घोडके, मतीन अली सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर काम करावे. बुथवर लक्ष केंद्रीत करावे. काँग्रेस व इंडिया आघाडीने समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देणारे गॅरंटी कार्ड तयार केले आहे. त्यातील प्रत्येक मुद्दा त्या-त्या घटकांपर्यंत आपण पोचवावा. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करावी. आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे प्रचंड मताधिक्याने विजयी कसे होतील, यासाठी आपल्याला लढायचे आहे. लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा विचार, विकास टिकवून ठेवण्यासाठी आपले गाव, आपलं बुथ सर्वांनी सांभळायचे आहे. प्रत्येक बुथवरुन आपल्या उमेदवाराला लीड मिळाली पाहिजे, यादृष्टीने काम करा.
डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे माझ्यावरील प्रेम भारावून टाकणारे आहे. सर्वांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते एकजुटीने प्रत्येक स्तरावर काम करीत आहेत. मेहनत, प्रामाणिकपणा ही आपली शक्ती आहे, या जोरावर आपण विजयश्री खेचून आणू, असा विश्वास आहे.प्रास्ताविक अनुप शेळके यांनी व सूत्रसंचालन दिनेश नवगिरे यांनी केले तर आभार सुभाष घोडके यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR