37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याभारतातील प्रजनन दरात मोठी घसरण!

भारतातील प्रजनन दरात मोठी घसरण!

नवी दिल्ली : चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला असला तरी भारतातील प्रजनन दरात वेगाने घसरण होत आहे. १९५० मध्ये ६.२ असलेला प्रजनन दर २०२१ मध्ये २ टक्के खाली आला असून २०५० मध्ये तो १.२९ आणि २१०० मध्ये १.०४ पर्यंत कमी होण्याचा अंदाज ‘लॅन्सेट’ नियतकालिकात व्यक्त करण्यात आला आहे.

केवळ भारताचीच अशी अवस्था नसून एकूण जागतिक प्रजनन दरही १९५० मधील ४.८ टक्क्यांहून २०२१ मधील २.२ पर्यंत घटला आहे. तो २०५० पर्यंत १.८ आणि २१०० पर्यंत १.६ पर्यंत घटण्याची शक्यता आहे.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) २०२१ फर्टिलिटी अ‍ॅँड फोरकास्ंिटग कोलॅबोरेशन्समधील संशोधकांच्या मते, संपूर्ण जगासमोरच घटत्या प्रजनन दराचे आव्हान असले तरी २१ व्या शतकात कमी उत्पन्न असणा-या अनेक देशांमध्येही अजूनही प्रजनन दर अधिक आहे.

पश्चिम आणि पूर्व उप-सहारा आफ्रिकेतील काही गरीब देशांतील उच्च प्रजनन दरांमुळे जग लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या विभाजित होईल. २०२१ ते २१०० दरम्यान जगातील सर्वाधिक गरीब देशांत जन्मणा-या मुलांचा एकूण जगातील वाटा १८ टक्क्यांहून ३५ टक्क्यांवर जाईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, हवामान बदलाच्या वाढत्या संकटामुळे या उच्च प्रजनन दर असलेल्या गरीब देशांना वारंवार येणारे पूर, दुष्काळ, प्रचंड उष्णता आदींचा सामना करावा लागू शकतो. त्यांना अन्न, पाणी व साधनसंपत्तीच्या असुरक्षिततेलाही तोंड द्यावे लागू शकते, असा इशाराही संशोधकांनी दिला. त्यासाठी, या देशांत महिलांचे शिक्षण आणि गर्भनिरोधकांमुळे उच्च प्रजनन दर आटोक्यात येऊ शकते, असेही त्यांनी सुचविले.

जगभरातील विविध वयोगटांतील लोकसंख्येवर या निष्कर्षांचा आर्थिक, भू-राजकीय, अन्न सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणदृष्ट्या सखोल परिणाम होईल. देशा-देशांमध्ये मध्यम ते उच्च उत्पन्न असणारे व कमी उत्पन्न असणारे अशी दरी पडू शकते, अशी भीतीही संशोधकांनी वर्तविली आहे. जोपर्यंत सर्व देशांतील सरकारे वृद्ध होणा-या लोकसंख्येच्या समस्या सोडविण्यासाठी नवकल्पना राबवित नाहीत किंवा निधीची तरतूद करत नाहीत. तोपर्यंत, या लोकसंख्या शास्त्रीय बदलामुळे राष्ट्रीय आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा योजना आणि आरोग्य सेवांशी संबंधित पायाभूत सुविधांवर ताण येऊ शकतो,अशी च्ािंताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. जागतिक लोकसंख्येत सातत्याने घट झाल्यास कार्बन उत्सर्जन तसेच संसाधनांवरील ताण कमी होऊन पर्यावरणीय प्रगतीसाठी संधी उपलब्ध होऊ शकते, हेही संशोधकांनी मान्य केले आहे.

जग
२०२१ मध्ये जन्मलेली बालके : १२.९ कोटी
१९५० च्या तुलनेत वाढ : ९.३ कोटी
२०१६ मध्ये जन्मलेली बालके : १४.२ कोटी

भारत
२०२१ मध्ये जन्मलेली बालके : १.६ कोटी
१९५० मध्ये जन्मलेली बालके : २.२ कोटी
२०५० मध्ये अपेक्षित बालके : १.३ कोटी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR