40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयसंकटात संधी!

संकटात संधी!

प्रत्येक संकटात एक संधीही दडलेली असते असे म्हणतात! संकटाने हात-पाय गाळून बसायचे की, आलेल्या संकटाशी भिडून त्यात दडलेल्या संधीचा योग्य वापर करून संकटावर मात करायची, हे बहुतांशी ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर व मानसिक कणखरतेवर अवलंबून असते. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने रविवारी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार ऐक्याचे प्रदर्शन घडवत जे रणशिंग फुंकले ते पाहता विरोधकांना संकटात टाकून येणारी निवडणूक एकतर्फी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या ‘अजेय जोडी’च्या पोटात नक्कीच गोळा उठला असणार! काँगे्रसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीने भाजपविरोधासाठी का असेना पण ऐक्याचे जोरदार प्रदर्शन करून जे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे ते पाहता ‘इंडिया’ आघाडीने संकटातील संधी योग्यरीत्या साधली आहे, असेच म्हणावे लागेल! ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वात आल्यापासून भाजपची ‘अजेय जोडी’ या आघाडीच्या ऐक्याला सुरुंग लावण्याचा हरत-हेने प्रयत्न करते आहे. दुर्दैवाने इंडिया आघाडीतील काही पक्षांच्या नेत्यांचे अहंकार व त्यांच्या सुप्त महत्त्वाकांक्षा यामुळे भाजपच्या प्रयत्नांना यश मिळून विरोधकांच्या या ऐक्याच्या चिरफळ्याच उडत असल्याचे चित्र होते. आघाडीचे नेतृत्व करणा-या काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेऊन मनाचा मोठेपणा दाखविण्याची तयारी दर्शवूनही तृणमूल काँग्रेस, आप, सपा वगैरे पक्षांनी आडमुठी भूमिका घेतल्याने आघाडीच्या जागावाटपात ऐक्याचे दर्शन होऊ शकले नव्हते.

त्यामुळे भाजपविरोधात प्रचाराचे एकत्रित रणशिंग फुंकण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न सफल होताना दिसत नव्हता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या ऐक्याचे दर्शन घडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांनी यावर बहिष्कार घातल्याने अपेक्षित एकजुटीचे प्रदर्शन घडण्याऐवजी उलट मतभेदांवरच जोरदार चर्चा झडली. त्यामुळे आपापल्या संकटाचा प्रतिकार करण्याच्या निमित्ताने का असेना दिल्लीच्या रामलीला मैदानावर सगळे विरोधक एकत्र आले आणि विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ देशवासीयांना पहायला मिळाली, हे आघाडीच्या दृष्टीने चांगलेच घडले. या शक्तिप्रदर्शनास नैमित्तिक कारण ठरले ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक! त्याला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेची व ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने काँग्रेससह विरोधी पक्षांना दंडाच्या नोटिसा पाठवून त्यांची बँक खाती गोठवण्याची जोड मिळाली! भाजपेतर पक्षांना नेमके काय म्हणायचे आहे आणि ते भाजपविरोधात का लढत आहेत, हे रामलीला मैदानावरून देशभरातील जनतेपर्यंत स्पष्टपणे व एकत्रितपणे पोहोचवण्याची संधी इंडिया आघाडीला या सभेद्वारे साधता आली.

२०२४ ची निवडणूक खुली व निष्पक्ष होण्यात सत्ताधारी भाजप जाणीवपूर्वक अडथळे आणत आहे, देशात लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर भाजपची ही दादागिरी थांबवावीच लागेल, केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून तिने भाजपची ही दादागिरी थांबवून विरोधी पक्षांची गळचेपी थांबवली पाहिजे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या सभेतून देशातल्या जनतेला सांगितले. विरोधकांच्या गळचेपीच्या आरोपांमध्ये तथ्य असणा-या घटना नजीकच्या काळात घडल्याने हे केवळ तथ्यहीन आरोप आहेत असे म्हणता येणार नाही, हे देशातील जनतेलाही ज्ञात आहेच! लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर प्राप्तिकर विभागाला काँग्रेसच्या कर परताव्यातील अनियमिततेची प्रकर्षाने आठवण होते. काँग्रेसची बँक खाती गोठवत क्रमाक्रमाने दंडाची रक्कम वाढविली जाते आणि त्याविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतल्यावर ‘लोकसभा निवडणूक होईपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही’, अशी साळसूद भूमिका प्राप्तिकर खाते घेते. मग प्राप्तिकर खात्याला हे शहाणपण न्यायालयात आल्यावरच सुचते हा निव्वळ योगायोग समजायचा का? ईडी ही देखील स्वायत्त संस्था.

मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल व हेमंत सोरेन यांच्या अटकेचे या स्वायत्त संस्थेने साधलेले ‘टायमिंग’ हा ही निव्वळ योगायोग समजायचा का? केजरीवाल दोषी असतील तर त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील साथीदारांसोबत वर्षभरापूर्वीच अटक का करण्यात आली नाही? असे प्रश्न नक्कीच उपस्थित होतात. भाजप प्रचंड आर्थिक व राजकीय सत्तेच्या बळावर निवडणुकीचे स्वरूप एकतर्फी बदलून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप ‘आम्ही यंत्रणांच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. तुम्ही कायदा मोडता म्हणून तुम्हाला शिक्षा होते’, असा साळसूद युक्तिवाद करून उडवून लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करतो आहे. मात्र, घडणा-या घटना विरोधकांचे आरोप अगदीच तथ्यहीन नाहीत हे दाखवून देण्यास पुरेशा आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला विरोधकांचे आरोप असेच उडवून लावता येणार नाहीत. तर निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष निष्पक्ष भूमिका घेत असल्याचे जनतेला प्रत्यक्ष दिसावे लागेल व पटावे लागेल! अन्यथा विरोधक निवडणूक प्रक्रियेवर घेत असलेली शंका योग्यच ठरेल.

रामलीला मैदानावरून एकत्रितरीत्या हे प्रश्न जोरकसपणे देशासमोर आणण्यात इंडिया आघाडी यशस्वी ठरली आहे, हे नक्की! त्याचा भाजपच्या कार्यशैलीवर कितपत परिणाम होईल, हा प्रश्न अलहिदा! मात्र, भाजपच्या दादागिरीस समर्थपणे प्रतिकार करण्याची संधी इंडिया आघाडीला आपल्या या ऐक्याच्या प्रदर्शनातून निश्चित साधता येते! इंडिया आघाडी ती कशी साधणार यावर येत्या निवडणुकीचे गणित ठरणार आहे. रामलीला मैदानावर दाखवलेले ऐक्य राज्याराज्यात दाखवण्याची इंडिया आघाडीतील नेत्यांनी इच्छाशक्ती ठेवली तर भाजपचा ही निवडणूक एकतर्फी होणार हे भासवण्याचा मनसुबा धुळीस मिळवला जाऊ शकतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या सभेत हाच प्रश्न उपस्थित केला. ‘इंडिया’तील ऐक्य टिकले नाही तर भाजपचा पराभव कसा करणार? या खर्गे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर इंडिया आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन करायची गरज आहे. असो! तूर्त भाजपच्या विरोधात आम्ही वेगवेगळे निवडणूक लढलो तरी एकच आहोत, हा संदेश मतदारांना देण्यात इंडिया आघाडीला यश आले हे निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR