37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याहिमाचल कॉँग्रेसवर बंडखोरीचे सावट; ११ आमदार उत्तराखंडला पोहोचले

हिमाचल कॉँग्रेसवर बंडखोरीचे सावट; ११ आमदार उत्तराखंडला पोहोचले

सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून सुरु झालेला राजकीय संघर्ष अजून टळलेला नाही. सहा बंडखोरांसह ११ आमदार शनिवारी भाजपशासित उत्तराखंडमध्ये पोहोचले. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरु असलेला गृहकलहाचा शेवट काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शनिवारी सकाळी हरियाणाची नंबर प्लेट असलेली एक बस हृषिकेशच्या ताज हॉटेलमध्ये पोहोचली. बसमध्ये ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांसह ११ आमदार होते. बसला कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.

काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले होते. राज्यातील पक्षाची परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी जेव्हा त्यांना सहा बंडखोर आमदारांविषयी विचारले, तेव्हा त्यांनी म्हटले की- जर कुणाला चुकीची जाणीव झाली असेल तर त्याला आणखी एक संधी दिली जाईल. त्याआधी हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य यांनी म्हटले की, मी काँग्रेस हायकमांड आणि बंडखोरांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. आता निर्णयाचा चेंडू नेतृत्वाच्या कोर्टात असल्याचे ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले होते. परिणामी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR